माझा जपानी लोकांसोबतचा व्यक्तिगत अनुभव

रेश्मा कुलकर्णी

10/27/20251 min read

जपानला पहिल्यांदा भेट दिल्यावर मी त्या देशाच्या सुंदरतेने मंत्रमुग्ध झाले. – तिथले नयनरम्य लँडस्केप्स, शतकानुशतके जुनी मंदिरे, आणि परंपरेत रुजलेली संस्कृती. त्याचबरोबर माझ्या मनावर ठसा उमटवला तो जपानी लोकांनी. प्रवासादरम्यान आणि स्थानिकांशी संवाद साधताना, मला अशी माणुसकी, आदर, आणि उदारता अनुभवायला मिळाली, जी मी फार कमी ठिकाणी पाहिली होती.

माझा जपानी आदरातिथ्याचा (*omotenashi*) अनुभव एका छोट्या गावातील आमच्या समूहाने एका कुटुंबाच्या चालवलेल्या होमस्टेमध्ये घेतला. वयोवृद्ध जोडप्याने आम्हाला अगदी घरच्यांसारखे वागवले. भाषेचा थोडा अडथळा असूनही, त्यांनी आमचे मनापासून स्वागत केले, आणि त्यांच्या हाताने बनवलेले जेवण प्रेमाने खायला घातले. त्यांचे प्रामाणिक आदरातिथ्य आम्हाला परदेशात असूनही घरचे वातावरण देत होते.

आणखी एक संस्मरणीय घटना क्योतो शहराच्या गर्दीने भरलेल्या बाजारात घडली. माझ्या बॅगेतून काहीतरी खाली पडले, आणि मी काही समजायच्या आतच, एका अनोळखी व्यक्तीने ते उचलून मला दिले, ते ही एक हलके हसू आणि वाकून आदराने. या छोट्याशा कृतीने जपानी समाजात असलेल्या आदर आणि सहकार्याची भावना स्पष्ट केली. जपानमध्ये लोक सहजतेने एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावतात, काहीही अपेक्षाशिवाय.

आदर हा जपानमधील प्रत्येक संवादाच्या केंद्रस्थानी आहे, आणि तो मला दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षणी जाणवला. दुकानांमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये होणाऱ्या स्वागतांतून, नम्रतेने केलेली अभिवादने, यामुळे जपानी लोकांमधील परस्पर आदराचे दर्शन घडले. मी जपानी भाषा बोलू शकते आणि शिकवतेही याबद्दल किती कौतुक आणि आदर वाटतो त्यांना. अनेकदा छोट्या मोठ्या भेटवस्तू खूप प्रेमाने देतात.

एकदा अशीच गंमत झाली मी रेल्वे स्टेशनवर जायला निघाले होते आणि मला उजवीकडे वळायचं की डावीकडे वळायचं तेच आठवत नव्हते, म्हणून सायकल वरून जाणाऱ्या एका तरुण मुलाला जपानी मधून रेल्वे स्टेशनला कुठे वळायचे हे विचारले तर तो ते स्टेशन दाखवायला माझ्याबरोबर यायला निघाला. मी त्याला म्हटले "अरे मला जपानी भाषा कळते, मला फक्त उजवीकडे की डावीकडे तेवढेच सांग" , पण पठ्ठ्या माझ्याबरोबर जवळजवळ एक किलोमीटर चालत मला स्टेशन पर्यंत सोडायला आला. हा सूर्य आणि हा जयद्रथ या अविर्भावात त्याने मला ते दाखवले आणि माझे धन्यवाद स्वीकारून हसत हसत निघून गेला.

असे अनेक अनुभव जपान मध्ये येतात. म्हातारी माणसं सुद्धा अत्यंत प्रेमळपणे तुम्हाला त्यांच्या देशात त्रास होऊ नये याची काळजी घेतात।

आमच्या All Aboard टूर दरम्यान देखील अनेक वेळा आमच्या बरोबरच्या मंडळींनाही असे अनुभव येतात।

मला सगळ्यात जास्त प्रभावीत केले ते जपानी लोक आपल्या दैनंदिन कामांकडे ज्या विचारशीलतेने आणि काळजीपूर्वक दृष्टिकोनातून पाहतात, त्याने. एका कुशल कारागिराला त्याच्या कलेत परिपूर्णता आणताना पाहणे असो किंवा एका शेफला साधे जेवण बनवताना पाहणे असो, प्रत्येक गोष्टीत समर्पण आणि अभिमान दिसून येतो.

मी एका चहा समारंभात चहा तयार करताना पाहिले, जिथे चहा बनवणारी व्यक्ती अतिशय सावधपणे, विचारपूर्वक सर्वकाही करत होती, तिच्या साठी ती पूर्ण प्रक्रिया ही जणू समाधी (मेडिटेशन) होती. यात जपानी संस्कृतीतील विचारशीलतेचे प्रतिबिंब दिसत होते.

या सर्व अनुभवांमधून मला असे जाणवले की जपानची खरी सुंदरता फक्त तिथल्या दृश्यांमध्ये नाही, तर तिथल्या लोकांच्या मनात आहे. जपानी लोकांनी मला शिकवले की छोट्या छोट्या कृतींमधूनही माणसांमध्ये खोलवर संबंध निर्माण होऊ शकतात, आणि यासाठी मी त्यांची मनःपूर्वक आभारी आहे.